Sport

जळगावमध्ये क्रिकेटचा महासंग्राम; जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर जेसीएलचा थरार!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात क्रिकेटचे वारे वाहू लागले असून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा उत्साह आता प्रत्यक्ष मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. स्थानिक खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL) या भव्य स्पर्धेचा थरार १८ ते २६ एप्रिल दरम्यान रंगणार आहे. मेहरूण परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणावर हा क्रिकेटचा महाकुंभ आयोजित करण्यात आला असून, शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न होईल.

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स व अलरीक इलेक्ट्रीकल्स यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर खेळवली जाणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाचोरा आमदार किशोर पाटील, चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, रावेर आमदार अमोल जावळे, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे आणि चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासोबतच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवतील. या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी जेसीएल व्यवस्थापनाची संपूर्ण टीम आणि बीसीसीआयचे नामांकित पंच परिश्रम घेत आहेत.

स्पर्धेचे स्वरूप अतिशय चुरशीचे असून यामध्ये जळगाव कोगटा किंग्ज, जामनेर सातपुडा हिरोज, पाचोरा एसकेटी योद्धाज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स, रावेर रॉयल्स आणि अमळनेर सुहास जायंट्स असे सहा संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील. एकूण १०८ खेळाडूंच्या या ताफ्यात जगदीश झोपे, शतायू कुलकर्णी, सचिन चौधरी, ओम मुंडे, धवल हेमनानी आणि शुभम शर्मा हे ‘आयकॉन’ खेळाडू म्हणून आपली चमक दाखवतील. प्रत्येक संघाला अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून, साखळी सामन्यांनंतर बाद फेरीचे सामने खेळवले जातील. एकूण १९ सामन्यांच्या या प्रवासात चौकार-षटकारांची आतषबाजी आणि गुगली-यॉर्करचे आव्हान प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

जैन ड्रीम स्पेसेसचे मैदान या स्पर्धेसाठी एखाद्या मेट्रो सिटीमधील स्टेडियमप्रमाणे सज्ज करण्यात आले आहे. येथे हिरवळीचे सुंदर लॉन, दर्जेदार टर्फ विकेट आणि रात्रंदिवस सामन्यांसाठी अत्याधुनिक एलईडी प्रकाशयोजना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मैदानाची बाउंड्री लाइन एलईडी स्क्रीन्सने सजली असून प्रेक्षकांसाठी भव्य आणि खुली गॅलरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ एप्रिलपासून दररोज विविध सत्रात सामने रंगणार असून २४ एप्रिलला क्वालिफायर, २५ ला एलिमिनेटर आणि २६ एप्रिल रोजी स्पर्धेचा भव्य अंतिम सामना खेळवला जाईल.

जळगावकरांसाठी ही स्पर्धा एक मोठी क्रीडा पर्वणी ठरणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button