MAHATET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

MAHATET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
जळगाव, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी जळगाव शहरातील ३० परीक्षा केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच “कॉपीमुक्त अभियान” प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत हे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार, २८ जून रोजी सकाळी ८ वाजता परीक्षा सुरू झाल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जळगाव शहरातील सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश परीक्षार्थी, परीक्षा व्यवस्थापनासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस व होमगार्ड यांना लागू राहणार नाही.
तसेच, परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स व छायांकित प्रत केंद्रे या कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हा आदेश संबंधितांना वैयक्तिकरित्या कळविण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने तो एकतर्फी स्वरूपात जारी करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.






