अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास ३०० कोटींचा निधी प्राप्त

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास ३०० कोटींचा निधी प्राप्त
पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याचे वितरण सुरू
जळगाव, : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ७५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. त्यापैकी आतापर्यंत महामंडळास एकूण १५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याचे वितरण करण्यात आले आहे.
व्याज परताव्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महामंडळाने ८ जुलै २०२६ रोजी शासनाकडे ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
त्यानुसार मंजूर करण्यात आलेला ३०० कोटी रुपयांचा निधी ९ ऑगस्ट २०२६ रोजी महामंडळाच्या अधिकृत बँक खात्यात जमा झाला. यापूर्वी प्राप्त झालेला ३०० कोटीचा रुपयांच्या निधी व नव्याने प्राप्त झालेला ३०० कोटींचा निधी असे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात महामंडळास आतापर्यंत एकूण ४५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
नव्याने प्राप्त झालेल्या निधीतून १० ऑगस्ट २०२६ रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे २१ कोटी रुपयांच्या व्याज परताव्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे. उर्वरित पात्र व प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही प्रगतिपथावर असून, ती पूर्ण झाल्यानंतर व्याज परताव्याची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
या निधीमुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी तसेच नवउद्योजकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. प्रलंबित व्याज परतावा प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यासाठी महामंडळामार्फत कार्यवाही सुरू असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.चे जिल्हा समन्वयक निखिल प. आखडकर प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.







