Other

जुन्या महामार्गाने घेतला बळी : भरधाव टँकरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी

जळगाव । चेतन वाणी । जळगाव शहरातील हॉटेल दरबार आणि सीएनजी गॅस पंप परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव टँकरच्या धडकेत एका कष्टकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मुलगा जखमी झाला आहे. बायपास महामार्ग बंद झाल्यानंतर शहरातून वाहतूक सुरू झाली असून पाचच दिवसात अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) या मुलगा भरत माळी (वय २९) याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मंगला माळी रस्त्यावर पडल्या आणि टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

टँकर चालकाने काढला पळ, पाठलाग करून पकडले
अपघातानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी तत्काळ त्याचा पाठलाग करून आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलजवळ टँकर अडवला. त्यानंतर चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नातेवाईकांचा आक्रोश
मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. आज पिंप्राळा परिसरातील बाजार असल्याने त्या भाजीपाला विक्रीसाठी जात होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. या दुर्घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईक आणि परिचितांनी मोठी गर्दी केली होती.

महामार्ग आणखी किती बळी घेणार
दरम्यान, जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या तरसोद-पाळधी महामार्गाच्या भरावाचा भाग खचल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी सर्व वाहने शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाने सुरू आहे. आजच्या अपघातानंतर शहरात भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची तसेच अशा अपघातांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button