Politics

मनपा प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; आयुक्त-महापौरांना घेराव

पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पथदिवे आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नांवरून दोन तास घोषणाबाजी; १५ दिवसांत समस्या सोडविण्याची मागणी

मनपा प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; आयुक्त-महापौरांना घेराव

पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पथदिवे आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नांवरून दोन तास घोषणाबाजी; १५ दिवसांत समस्या सोडविण्याची मागणी

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महानगर शाखेच्या वतीने गुरुवारी (२० ऑगस्ट) महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. तसेच आयुक्त व महापौर यांना घेराव घालत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर नाराजी

शहरातील अनेक भागांत नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. रात्री-अपरात्री पाणी सोडले जात असून, काही भागांत कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच नागरिकांना पूर्वसूचना न देता महिन्यातून दोन-तीन वेळा पाणीपुरवठा पुढे ढकलला जात असल्याचेही पक्षाने म्हटले आहे.

पाणीपुरवठा सुरळीत नसताना महापालिकेकडून वॉटर मीटर बसवून पाणीपट्टी वसुलीची तयारी सुरू असल्याचा आरोप करत, २४ तास सुरळीत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची क्षमता तपासल्यानंतरच वॉटर मीटरचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

रस्त्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी

पावसाळ्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रत्येक प्रभागात रस्ते दुरुस्तीसाठी कामे मंजूर करण्यात आली असतानाही संबंधित मक्तेदारांकडून कामे केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. मनपा प्रशासनाने अशा मक्तेदारांकडून कामे काढून घेऊन तत्काळ अन्य मक्तेदारांकडून रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी पक्षाने केली.

पथदिव्यांचा प्रश्नही ऐरणीवर

शहरातील महामार्गालगत तसेच विविध भागांतील अनेक पथदिवे बंद आहेत. दिवे दुरुस्त करण्यास किंवा नवीन दिवे बसविण्यास मोठा विलंब होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. अजिंठा चौफुली ते विमानतळ परिसरात सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे बसविण्याचे काम दोन वर्षांपूर्वी मंजूर होऊनही अद्याप पूर्ण झाले नसल्याने ते तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

स्वच्छतेचा प्रश्न गंभीर

शहरातील कचरा संकलन आणि साफसफाई व्यवस्था कोलमडल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने संबंधित यंत्रणेतील निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करा

शहरात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांची संख्या वाढली असून, नागरिक व लहान मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा पक्षाने केला. संबंधित मक्तेदाराकडून अपेक्षित काम होत नसल्यास नवीन मक्तेदाराची तातडीने नियुक्ती करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची मागणी

शिवाजीनगर उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवून परिसराचे सुशोभीकरण करावे. उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी लोखंडी जिना उभारण्याची मागणी गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत असून, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा जिना तातडीने उभारावा, अशी मागणी करण्यात आली.

मेहरुणमधील स्मशानभूमीला सुविधा द्या

मेहरुण शिवारातील उद्यान परिसरातील स्मशानभूमीच्या विकासासाठी यापूर्वीही आंदोलन करण्यात आले आहे. मात्र अद्याप या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे पक्षाने म्हटले आहे. स्मशानभूमीत मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

१५ दिवसांची मुदत; अन्यथा मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा

शहरातील नागरिकांच्या या समस्या १५ दिवसांच्या आत सोडविण्यात याव्यात, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांनी दिला.

या आंदोलनात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, प्रदेश चिटणीस प्रतिभाताई शिरसाट, विकासदादा पवार, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, सुनील भैय्या माळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button