जळगावात भाजपला धक्का; गिरीश महाजनांच्या समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहराच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे आणि जवळचे समर्थक मानल्या जाणाऱ्या जळगावमधील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. या सर्व तरुणांनी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या धडाकेबाज पक्षांतरामुळे जळगावात भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) कमालीची मजबूत झाली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
आमदार किशोर पाटील यांनी जळगाव शहरातील भाजपच्या या मातब्बर तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधत थेट मुंबई गाठली. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी या सर्व तरुणांचे भगवा पट्टा बांधून पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी जळगावच्या विकासासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या कामावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नावे
या धडाकेबाज पक्षप्रवेशात जळगाव शहरातील भुषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राझिक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी, तौफिक खान या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
जळगावच्या राजकारणात नवे समीकरण?
गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे हे तरुण कार्यकर्ते शिवसेनेत गेल्यामुळे जळगाव शहरात भाजपसाठी हा मोठा पळतीचा काळ मानला जात आहे. आगामी काळात आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या गोटात केलेली ही मोठी पडझड जळगावच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






