
सरकार तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे’; विद्यार्थ्यांशी संवाद साधा, अन्यथा रस्त्यावर उतरू – रोहिणी खडसे
एमपीएससी ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयावरून रोहिणी खडसे यांचा सरकारवर हल्लाबोल
जळगाव | प्रतिनिधी
एमपीएससीच्या गट अ, ब आणि क संवर्गाच्या पूर्व परीक्षा २०२७ पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहत असून हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहिणी खडसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, मागील महिन्यात नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील स्वप्न उद्ध्वस्त झाले. त्यानंतर टीईटी पेपरफुटीने शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. आता एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय
रोहिणी खडसे म्हणाल्या की, ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयाला लाखो परीक्षार्थींचा विरोध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकावर परीक्षा देण्याचा पुरेसा सराव नाही. सर्व तालुका किंवा जिल्ह्यांमध्ये दर्जेदार सीबीटी परीक्षा केंद्रे उपलब्ध नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागू शकतो. तसेच वीज, इंटरनेट, संगणक बिघाड किंवा सर्व्हर डाऊन झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
‘काही कंपन्यांच्या भल्यासाठी तर हा खटाटोप नाही ना?’
खासगी परीक्षा केंद्रांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहिणी खडसे यांनी, “इतक्या अडचणी असताना एमपीएससीने हा निर्णय कशाच्या आधारावर घेतला? काही कंपन्यांच्या भल्यासाठी तर हा खटाटोप नाही ना?” असा सवाल उपस्थित केला.
आंदोलनाचा इशारा
सरकारने तातडीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकावे आणि सर्वसमावेशक निर्णय घ्यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महिला विभाग विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही रोहिणी खडसे यांनी दिला.






