OtherSocial

ब्रेकिंग : प्रति पंढरपूर संत सखाराम महाराज वाडी संस्थानात भीषण आग

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. आषाढी महिन्याच्या पार्श्वभूमीवर संस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असताना ही घटना घडल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांना वेळीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, बुधवार रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संस्थान परिसरातील सोलर पॅनल विभागात अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. खबरदारीचा उपाय म्हणून संस्थानातील सेवेकरी आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्वरित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जाते.

आगीमुळे संस्थानाच्या परिसरात किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याचा अधिकृत पंचनामा अद्याप झालेला नाही. पोलीस आणि संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. घटनेबाबतचा अधिकृत अहवाल आणि नुकसानाचा तपशील प्रशासनाकडून जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button