रासायनिक खतांचा संयमी वापर करा, जमिनीची सुपीकता जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा; प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव

रासायनिक खतांचा संयमी वापर करा, जमिनीची सुपीकता जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा; प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव
जळगाव | प्रतिनिधी
शेतीचे वाढते उत्पादन आणि जमिनीची सुपीकता यांचा समतोल राखणे ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित शेतकरी सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महापौर दीपमाला काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा विहीर योजनेचे कार्यारंभ आदेश वितरित करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच खरीप हंगामात उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संभाव्य एल-निनो परिस्थितीचा उल्लेख करत शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला. सिंचनाची सुविधा नसलेल्या भागांमध्ये किमान ८० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी एकपिकीय पद्धतीऐवजी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धती स्वीकारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “जळगाव आपलं, सर्वात पहिलं” या संकल्पनेप्रमाणे कृषी क्षेत्रातही जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर नेण्यासाठी शेतकरी आणि कृषी विभागाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या हरित महाराष्ट्राच्या स्वप्नाचा उल्लेख करत, त्या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी राज्यातील शेतकरी करत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शेतकरी अधिक सक्षम, समृद्ध आणि तंत्रज्ञानस्नेही व्हावेत यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे नवे बदल घडत असून त्याचा प्रभावी वापर केल्यास उत्पादनवाढीसोबत शेती अधिक कार्यक्षम होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून एआय आधारित शेती पद्धतींचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी प्रास्ताविकातून कृषी दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत कृषी क्षेत्रातील नव्या संधी आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली.






