मंगळग्रह मंदिरात महारुद्र पूजेची भक्तिमय सांगता
असंख्य भाविकांनी घेतला धार्मिक सोहळ्याचा अनुभव


मंगळग्रह मंदिरात महारुद्र पूजेची भक्तिमय सांगता
असंख्य भाविकांनी घेतला धार्मिक सोहळ्याचा अनुभव
अमळनेर : मंत्रोच्चार, रुद्रघोष, भजन आणि हर हर महादेवच्या जयघोषाने भारलेल्या वातावरणात श्री मंगळग्रह मंदिरात सुरू असलेल्या तीन दिवसीय महारुद्र अभिषेक पूजेची शुक्रवारी (११ सप्टेंबर) दुपारी पूर्णाहुती झाली. पूर्णाहुतीच्या धार्मिक विधींना असंख्य भाविकांची उपस्थिती लाभली. या वेळी मंदिर परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी, लोककल्याण तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीसाठी प्रथमच या भव्य धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार (९ सप्टेंबर) रोजी प्रारंभ झालेल्या या सोहळ्याचा समारोप शुक्रवारी विविध धार्मिक विधींनी करण्यात आला.
प्रधान आचार्य वेदमूर्ती केशव पुराणिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विधी पार पडले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले आणि त्यांच्या पत्नी आशाताई महाले हे यजमान होते. पूर्णाहुतीच्या दिवशी सकाळी देवतांची पूजा, आवाहन व स्थापना करण्यात आली. ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडल’ येथे भगवान महादेव, श्री मंगळग्रह देव, भूमिमाता आणि पंचमुखी हनुमानजी यांची विधिवत स्थापना करण्यात आली.
यानंतर अरणीमंथनातून अग्नी प्रज्वलित करून नवग्रह रुद्रांची स्थापना करण्यात आली. रुद्राच्या १२१ आवर्तनांसह हवन करण्यात आले. यामध्ये सुमारे दोन हजार आहुती अर्पण करण्यात आल्या. तांडवस्तोत्राच्या सादरीकरणाने धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेले. विशेष हवन, बलिदान आणि पूर्णाहुतीनंतर महाआरती व मंत्रपुष्पांजली झाली.
भक्तिगीतांवर भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
महाआरतीनंतर पुरोहितांनी वाद्यवृंदाच्या साथीने शिवशंकरांची भक्तिगीते सादर केली. या वेळी डॉ. डिगंबर महाले, आशाताई महाले, आमदार अनिल पाटील, जयश्री पाटील यांच्यासह अनेक भाविकांनी भक्तिगीतांवर नृत्याचा आनंद घेतला. त्यामुळे धार्मिक सोहळ्याला उत्साहाची वेगळीच रंगत आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.
आमदार अनिल पाटील यांची टाळ वादनातून सेवा
पूर्णाहुतीच्या कार्यक्रमापूर्वी आमदार अनिल पाटील यांनी ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडल’ येथे काही वेळ उपस्थित राहून भजनाला टाळ वादनाची साथ दिली. श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकरांच्या स्तुतीपर भजनांमध्ये ते भक्तिभावाने सहभागी झाले. त्यांच्या या सहभागाचा उपस्थित भाविकांनीही आनंद घेतला.
अयोध्या-प्रयागराजहून आले पुरोहित
महारुद्र अभिषेकासाठी जळगावसह अयोध्या आणि प्रयागराज येथूनही पुरोहितांना निमंत्रित करण्यात आले होते. वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, शुभम वैष्णव, प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, पवन शर्मा, यश जोशी, चंद्रकांत जोशी, तुषार दीक्षित, जयंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे आणि हेमंत गोसावी यांच्यासह गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा आणि हरिओम शुक्ल यांनी पौरोहित्य केले.
सोहळ्याच्या आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, उमाकांत हिरे, बाळा पचार, पुषंद ढाके आदींनी परिश्रम घेतले.







