कबचौ उमवि पेट-2026 प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन अर्ज सुरू

कबचौ उमवि पेट-2026 प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन अर्ज सुरू
२३ ते २६ सप्टेंबरदरम्यान होणार पीएच.डी. प्रवेश परीक्षा
जळगाव, दि. २४ जुलै : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. प्रवेशासाठीच्या पेट (PET)-2026 परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, आज (२४ जुलै) पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी निर्धारित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
२४ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारणार
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ ऑगस्ट २०२६ आहे. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १७ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवारांच्या लॉगइनवर हॉल तिकीट (प्रवेशपत्र) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२३ ते २६ सप्टेंबरदरम्यान परीक्षा
पेट-2026 प्रवेश परीक्षा २३ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची हार्ड कॉपी १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधित विभागाकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे.
पेटमधून सूटबाबतही माहिती उपलब्ध
पेट परीक्षेतून सूट (Exemption) मिळणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक निकष, वेळापत्रक आणि सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून, अर्ज भरताना अचूक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे नियमानुसार अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेळेत अर्ज भरण्याचे आवाहन
पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी पेट (PET) ही अनिवार्य प्रवेश परीक्षा असल्याने अंतिम तारखेची प्रतीक्षा न करता वेळेत ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन विद्यापीठाच्या संशोधन विभागामार्फत करण्यात आले आहे.






