नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तात्काळ नोंद करावी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तात्काळ नोंद करावी
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सूचना; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
जळगाव (प्रतिनिधी) : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पीक विमाधारक शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा दाव्याची माहिती नोंदविताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दूरध्वनीद्वारे संबंधित आयुक्तांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती ऑनलाइन पद्धतीने तातडीने नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य नाही, त्यांनी तालुकास्तरीय विमा प्रतिनिधी किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्यामध्ये क्षेत्र कमी दाखविण्यात आले आहे किंवा ज्यांचे विमा अर्ज विविध कारणांमुळे रद्द झाले आहेत, अशा प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पंचनामा करून वास्तविक क्षेत्र विचारात घेण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती वेळेत नोंदवून विमा दाव्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले आहे.






