Social

पोलंडमध्ये मराठी मातीचा सुगंध; महाराष्ट्र मंडळातर्फे गणेशोत्सव उत्साहात

पोलंडमध्ये मराठी मातीचा सुगंध; महाराष्ट्र मंडळातर्फे गणेशोत्सव उत्साहात

व्रात्स्वोव शहरात २५० हून अधिक नागरिकांची उपस्थिती; भारतीयांसह पोलिश नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग

पोलंड : भारतीय संस्कृती आणि परंपरेचा वारसा परदेशी भूमीतही अनुभवता यावा, या उद्देशाने पोलंडमधील व्रात्स्वोव शहरातील महाराष्ट्र मंडळ पोलंडतर्फे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला २५० हून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावत गणरायाचे दर्शन घेतले. भारतातील विविध राज्यांतून पोलंडमध्ये स्थायिक झालेले भारतीय तसेच स्थानिक पोलिश नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गणेशोत्सवानिमित्त मराठी कलाकारांनी स्थानिक मातीपासून हाताने तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आरतीनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांनी सादर केलेली गाणी आणि नृत्ये तसेच इतर भाषिक समुदायातील नागरिकांनी लोकप्रिय गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यप्रस्तुतीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

जयती देवरे यांनी हाताने तयार केलेली सुंदर व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हे यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. परदेशातही भारतीय परंपरेशी असलेली नाळ जपण्याचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

‘गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय समाजातील विविध भाषा आणि प्रांतांतील नागरिकांना एकत्र आणणारा, तसेच पोलंडमधील स्थानिक नागरिकांपर्यंत भारतीय संस्कृती पोहोचविणारा दुवा आहे. विविध भाषिक आणि प्रांतीय पार्श्वभूमीचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात, हीच भारतीय परंपरेची ताकद आहे,’ अशी भावना महाराष्ट्र मंडळ पोलंडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

उत्सवाच्या यशस्वितेसाठी वैभव व समीक्षा सानप, तुषार व पूजा ओस्तवाल, पुनम व धिरज पाटील, सविता व अभिजित क्षीरसागर, गिरीश सुळे, अजय ओतारी, महेंद्र यादव, क्षितिज केळकर तसेच महाराष्ट्र मंडळाच्या सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button