भडगावचे सुपुत्र सोपान महाजन यांना ‘महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार’ 2026 प्रदान

भडगावचे सुपुत्र सोपान महाजन यांना ‘महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार’ 2026 प्रदान
भडगाव – प्रतिनिधी (विजय माळी)
सामाजिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भडगावचे सुपुत्र सोपान रमेश महाजन यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा गौरव सोपान महाजन यांच्या पदरी पडला.
बी.एस.एफ. बहुउद्देशीय संस्था, अमरावती, अपेक्षित नायक न्यूज तसेच संत कबीर बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोपान महाजन यांनी कला क्षेत्रात अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी लिहिलेली व स्वरबद्ध केलेली अनेक गीते रसिकांच्या पसंतीस उतरली असून, विविध गीतांमधील त्यांच्या अभिनयालाही विशेष दाद मिळाली आहे. समाजप्रबोधनाच्या उद्देशाने त्यांनी महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित प्रेरणादायी गीते साकारली आहेत. कला क्षेत्रातील योगदानासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सामाजिक बांधिलकी आणि कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोपान महाजन यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल महाजन परिवारासह संपूर्ण भडगाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






