
पाणीगळती रोखा, पाणी वाया घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा : महापौर दीपमाला काळे
बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना
जळगाव जळगाव शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाची महत्त्वाची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौरांनी शहरातील पाणीगळती आणि पाण्याच्या नासाडीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस पाणीपुरवठा विभाग प्रमुख घृष्णेश्वर साळुंखे यांच्यासह विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील विविध भागांत नळांना आणि पाइपलाइनला होणारी पाणीगळती तातडीने रोखण्याचे आदेश महापौरांनी दिले. तसेच, अनधिकृतपणे किंवा निष्काळजीपणे पाणी वाया घालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरातील वॉटर मीटर बसवण्याबाबतची सध्याची कार्यपद्धती आणि त्यासंबंधीची सविस्तर माहिती लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या.
शहरातील नागरिकांनी आपापल्या नळांना तोट्या लावाव्यात, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही, याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये/वार्डांमध्ये सर्व्हे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व्हेद्वारे कोणत्या नागरिकांनी नळांना तोट्या लावल्या आहेत आणि कोणी लावलेल्या नाहीत, याची प्रत्यक्ष तपासणी करावी असे महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.
पाणी हे अत्यंत मोलाचे असून त्याचा एकही थेंब वाया जाऊ नये यासाठी महापालिका आता ॲक्शन मोडवर आले आहे. नागरिकांनीही महापालिकेला सहकार्य करून नळांना तोट्या लावाव्यात आणि पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले.







