ग्रामीण भागासाठी रोजगार हमी योजनेकरिता नवीन अधिनियम लागू

ग्रामीण भागासाठी रोजगार हमी योजनेकरिता नवीन अधिनियम लागू
जळगाव, : भारत सरकारने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) ‘VB-G RAM G’ अधिनियम, 2025 मंजूर केला असून सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (MGNREGS) ऐवजी हा अधिनियम लागू करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे, आजीविकेचे विविधीकरण करणे तसेच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील कुटुंबांना हक्काचा रोजगार पुरवणारी रोजगार हमी योजना आता नव्या स्वरूपात आणि अधिक व्यापक उद्दिष्टांसह ‘VB-G RAM G’ या नावाने ओळखली जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना तसेच नवीन सॉफ्टवेअर प्रणालीबाबतची माहिती शासन स्तरावरून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
योजनेतील या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी , तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच संबंधित तांत्रिक यंत्रणेला आवश्यक निर्देश निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे यांनी दिली आहे.





