Crime

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघड

दोन आरोपी ताब्यात; चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघड

दोन आरोपी ताब्यात; चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त

जळगाव : कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून चोरीस गेलेल्या १८ शेळ्या आणि ५ बोकड अशा एकूण २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा कासोदा पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेल्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त केले आहे.

३ सप्टेंबरच्या रात्री चोरी

कासोदा परिसरातील एका शेतातील पत्री शेडमधून ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १८ लहान-मोठ्या शेळ्या आणि ५ लहान-मोठे बोकड चोरून नेले होते. याप्रकरणी ६ सप्टेंबर रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.

तांत्रिक तपासातून मध्यप्रदेशात शोध

सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी पोलिस अधिकारी व अंमलदारांचे तपास पथक तयार केले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातील बडी गाव गाठले.

तेथून अजय राजू चौव्हाण (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता दोघांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.

इतर आरोपींचा शोध सुरू

दोघांकडे अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा तसेच चोरीस गेलेल्या उर्वरित शेळ्या-बोकडांचा शोध घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ग्रेड पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल किरण गाडीलोहार आणि पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button