श्री मंगळग्रह मंदिरात डिजिटल नोटीस बोर्डची यशस्वी चाचणी

श्री मंगळग्रह मंदिरात डिजिटल नोटीस बोर्डची यशस्वी चाचणी
‘मंगल टीव्ही ॲप’द्वारे भाविकांना मिळणार पूजा, महाप्रसादासह विविध माहिती
अमळनेर I महा पोलीस न्यूज येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मंदिरातील डिजिटल नोटीस बोर्ड व्यवस्थेसाठी २१ नोव्हेंबर रोजी अँड्रॉइड टीव्हीवर पर्मनंट ऑटो कंट्रोल ॲप इन्स्टॉल करण्यात आले. ‘मंगल टीव्ही ॲप’च्या माध्यमातून मंदिराशी संबंधित विविध माहिती टीव्ही स्क्रीनवर प्रदर्शित करणे सुलभ होणार आहे.
मंदिरासमोरील टीव्हीवर या ॲपची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, ॲप व्यवस्थित कार्यरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांना मंदिरातील महत्त्वाच्या सूचना आणि धार्मिक विधींची माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाप्रसादापासून पूजा बुकिंगपर्यंत माहिती
‘मंगल टीव्ही ॲप’च्या माध्यमातून मंदिरातील डिजिटल नोटीस व महत्त्वाच्या सूचना, महाप्रसादाची मोजणी व प्रतीक्षेची माहिती, अभिषेक पूजा बुकिंग व प्रतीक्षा, हवनात्मक शांतीपूजेची प्रतीक्षा, विविध पूजा व धार्मिक विधींची माहिती प्रदर्शित करता येणार आहे. याशिवाय जाहिराती, प्रायोजकांची माहिती, यूट्यूब व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ लिंकसह मंदिराशी संबंधित विविध डिजिटल माहितीही टीव्ही स्क्रीनवर दाखविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मंदिर व्यवस्थापनात आधुनिकतेची भर
डिजिटल नोटीस बोर्डमुळे भाविकांना आवश्यक माहिती सहजपणे मिळण्यास मदत होणार असून, मंदिरातील माहिती व्यवस्थापन अधिक सुसूत्र आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. मंदिर व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.






