
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, आता या कुत्र्यांच्या हैदोसामुळे केवळ माणसांच्याच नव्हे, तर मुक्या जनावरांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा महानगरपालिकेचा मक्ता संपुष्टात आल्याने शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याच बेफिकीर कारभाराचा आणखी एक संतापजनक प्रकार शनिपेठ परिसरात समोर आला आहे. चार मोकाट कुत्र्यांनी एका निष्पाप वासरावर जीवघेणा हल्ला केला. एका महिलेने प्रसंगावधान दाखवून कुत्र्यांना हटकले नसते, तर या मुक्या जीवाचा जीव वाचणे कठीण झाले असते.
शनिपेठ परिसरात राहणारे हर्षल ज्ञानेश्वर चौधरी यांनी गाय पाळली असून, तिचे एक लहान वासरूही आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी या वासराला लोटगाडीच्या कवचाचा आधार करून त्यामध्ये सुरक्षितपणे बांधून ठेवले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास या मुक्या जीवावर काळ बनून चार मोकाट कुत्रे धावून आले.
रात्री साधारण २.२५ वाजण्याच्या सुमारास चार कुत्र्यांनी वासरावर अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांनी वासराला ओरबाडत त्याच्या कानाला आणि डोक्याला गंभीर जखमा केल्या. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वासरू रक्तबंबाळ झाले. जीवाच्या आकांताने वासरू ओरडत असताना त्याची आई असलेल्या गायीची अस्वस्थता वाढली. मात्र, या मुक्या जीवाला स्वतःचा बचाव करणेही शक्य नव्हते.
महिलेचे प्रसंगावधान; वाचले मुक्या जीवाचे प्राण
वासराचा आक्रोश आणि कुत्र्यांचा आवाज ऐकून समोरच्या घरातील एका महिलेला जाग आली. त्यांनी तातडीने बाहेर येत कुत्र्यांना हटकले. महिलेच्या या प्रसंगावधानामुळे कुत्र्यांनी वासराला सोडून पळ काढला आणि एका निष्पाप मुक्या जीवाचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
नागरिकांच्या अंगावर येतो काटा
ही घटना केवळ एका वासरावरील हल्ल्यापुरती मर्यादित नाही. त्या ठिकाणी एखादे लहान मूल असते, तर काय अनर्थ घडला असता? मध्यरात्री घराबाहेर खेळणाऱ्या किंवा झोपेतून बाहेर पडणाऱ्या चिमुकल्यांवर अशाच प्रकारे कुत्र्यांनी हल्ला केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या विचारानेच परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. एका बाजूला निष्पाप वासरू रक्तबंबाळ होईपर्यंत कुत्र्यांच्या तावडीत अडकते, तर दुसऱ्या बाजूला चिमुकल्यांना कुत्र्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतो. अशा घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? एखाद्या निष्पाप बालकाचा किंवा नागरिकाचा जीव गेल्यानंतरच महानगरपालिका ठोस पावले उचलणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिमुकल्याला तीन वेळा कुत्र्यांचा चावा
शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव यापूर्वीही समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी काट्याफाईल परिसरात राहणाऱ्या तौसिफ पिंजारी यांच्या चिमुकल्याला मोकाट कुत्र्यांनी तब्बल तीन वेळा चावा घेतल्याची घटना घडली होती. या गंभीर प्रकारानंतर पिंजारी यांनी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रारही केली आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
मनपाचा मक्ता संपला, पण नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोणाची?
शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडणे आणि त्यांचे निर्बिजीकरण करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, संबंधित कामाचा मक्ता संपुष्टात आल्याने या कामात खंड पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसतील, तर नागरिकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची?
प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न केवळ निर्बिजीकरणापुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. जखमी वासराच्या वेदना आणि त्याचा आक्रोश हा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. आता तरी महानगरपालिका प्रशासनाने जागे होऊन मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच मुक्या जीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही प्रशासनाने विसरू नये, एवढीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.







