पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अमळनेरात उद्या विकासकामांचे भूमिपूजन व शिवसेना संपर्क कार्यालयाचे लोकार्पण

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अमळनेरात उद्या विकासकामांचे भूमिपूजन व शिवसेना संपर्क कार्यालयाचे लोकार्पण
अमळनेर, प्रतिनिधी : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या आठवडे बाजार ओट्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच अमळनेर विधानसभा शिवसेना संपर्क कार्यालयाचे लोकार्पण २१ रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्यासह नगरसेवकांच्या प्रयत्नातून अमळनेर नगरपरिषद हद्दीतील फायनल प्लॉट क्रमांक १२३ येथे आठवडे बाजाराचे सुसज्ज ओटे बांधण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल. तसेच, सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे रोडवरील ‘शिवांश बिझनेस हब’ येथे अमळनेर विधानसभा शिवसेना संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत असून, त्याचेही लोकार्पण दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना उपनेत्या सरिता माळी (कोल्हे), शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक सभापती, गटनेते, नगरसेवक आणि मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत.
फायनल प्लॉट क्रमांक १२३ व शिवांश बिझनेस हब, धुळे रोड येथे होणाऱ्या या कार्यक्रमास सर्व आजी-माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे चेअरमन, सदस्य, पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथप्रमुख आणि व्यापारी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील आणि शहरप्रमुख विलास कंखरे यांनी केले आहे.







