जळगाव पोलिसांच्या शिरपेचात मानाचे तीन तुरे; श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक, दोन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलातील जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली जफरअली सैय्यद यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे तसेच पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा या सन्मानातून गौरव झाला आहे.
यासोबतच पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली जफरअली सैय्यद यांच्या प्रदीर्घ व गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेला राष्ट्रपती पदकाच्या माध्यमातून सन्मान मिळाला आहे. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि उल्लेखनीय पोलीस सेवेसाठी त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
एकाच वेळी जळगाव पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना राज्य शासन आणि राष्ट्रपती स्तरावरील सन्मान जाहीर झाल्याने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचे तीन तुरे खोवले गेले आहेत. या पुरस्कारामुळे जळगाव पोलिसांच्या कामगिरीचा राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला असून, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या तिन्ही अधिकाऱ्यांचे जळगाव जिल्हा पोलीस दलासह विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.
उद्या दि.१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शासकीय ध्वजरोहन कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.







