मोठी बातमी : पाचोरा पोलिसांनी पकडल्या २० तलवारी, एकाला अटक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात माहिजी नाका परिसरात अवैधरित्या तलवारी विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर दि.१८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसांनी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५४ हजाराच्या १८ तलवारी जप्त करण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सोहेल शेख हा पाचोरा शहरात तलवारी विक्रीसाठी घेऊन आला आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि लपवून ठेवलेल्या तलवारींचे ठिकाण दाखवले. तसेच, त्याने काही तलवारी आधीच विकल्याचेही सांगितले.
पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाचोरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी दि.१९ सप्टेंबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६०/२०२५ अंतर्गत भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस ठाणे करीत आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोउपनिरीक्षक कैलास ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीष परदेशी यांनी यशस्वीपणे पार पाडली.






