बोदवड पोलिसांची दमदार कामगिरी, चोरीच्या ३४ दुचाकी केल्या हस्तगत

महा पोलीस न्यूज । १५ जुलै २०२४ । बोदवड पोलिसांनी दमदार कामगिरी केली असून दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना पथकाने तब्बल ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड शहरातील नयनतारा भागात फिर्यादी विजय पुंडलिक माळी, व्यवसाय- किराणा दुकान रा.वार्ड नं १६, म्हसोबा मंदीराजवळ ता.बोदवड जि.जळगांव यांनी त्यांच्या मालकीची होन्डा शाईन कंपनीची मो.सा. क्रमांक एमएच.१९.सीए.५१८७ हि दिनांक १९ जून रोजी दुपारी २ वाजता बोदवड येथे बाजार असल्याने बाजारात पार्क केली होती. त्यानंतर ते दुपारी २.१५ वाजेचे सुमारास बाजार करुन घरी जाण्यासाठी मो.सा. लावलेल्या ठिकाणी आले असता दुचाकी दिसली नाही. याप्रकरणी दि.२६ जून रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा उघडकिस येणेकरीता पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी सो जळगांव, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे यांनी वेळोवेळी सुचना देवून मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास करून गुप्त बातमीदारामार्फत आरोपी जितेंद्र ऊर्फ दगडू नारायण सोनवणे वय-३१ रा.वरणगांव ह.मु.न्यु हुडको कॉलनी, भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव यास भुसावळ येथुन मोठ्या शिताफिने पकडून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे सोबत असलेला सहआरोपी रूपेश ज्ञानेश्वर चौधरी वय- २६ रा.सिद्धेश्वर नगर, वरणगांव ता.भुसावळ जि.जळगांव असे सांगीतल्याने त्यास सुद्धा वरणगाव सिद्धेश्वर नगर येथुन त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतले.
जळगाव जिल्हा, मलकापूरच्या ३४ दुचाकी हस्तगत
आरोपीतांना गुन्ह्यात अटक करून त्यांना विश्वासात घेवुन चोरीस गेलेल्या मोटार सायकलीबाबत विचारपुस केली असता त्यांनी बोदवड, मुक्ताईनगर, वरणगांव, नांदुरा व मलकापुर पोलीस स्टेशन हद्दीत व इतर परीसरातील मोटार सायकली चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली. पोलिसांनी चोरट्यांकडून १७ लाख किमतीच्या ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
‘या’ पथकाने केली कारवाई
संपूर्ण कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी सो जळगांव, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पंढरीनाथ गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर शेजोळे, रविंद्र एकनाथ गुरचळ, शशिकांत भिवा शिंदे, शशिकांत शिवराम महाले, भुषण उत्तम सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.