पैशाच्या वादातून जीवे मारण्याची धमकी देत दुकानाची तोडफोड

पैशाच्या वादातून जीवे मारण्याची धमकी देत दुकानाची तोडफोड
जळगाव | ४ जून – समतानगर परिसरात किराणा दुकान चालवणाऱ्या दुकानदाराला तीन जणांनी पैशाच्या वादातून जिवे मारण्याची धमकी देत दुकानात तोडफोड केली. ही घटना सोमवारी (२ जून) रात्री घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नईम कादीर खाटीक (वय ५२, रा. समतानगर, जळगाव) हे आपल्या घराशेजारीच किराणाचे दुकान चालवतात. सोमवारी रात्री काही वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने तीन जण दुकानात आले. त्यांनी किराणा वस्तू घेतल्यानंतर पैशाच्या देवाणघेवाणीवरून दुकानदाराशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे पर्यवसान हाणामारीच्या प्रकारात झाले. या तिघांनी दुकानदाराला जिवे मारण्याची धमकी दिली, दुकानातील वस्तू खाली फेकून नुकसान केले आणि घराच्या खिडक्यांची काच फोडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर नईम खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार संजय सपकाळे करीत आहेत.