कोविड रजेवरून फरार खून प्रकरणातील दोषीला स्थानिक गुन्हे शाखेची अटक

कोविड रजेवरून फरार खून प्रकरणातील दोषीला स्थानिक गुन्हे शाखेची अटक
यवतमाळ प्रतिनिधी
खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेला आणि कोविड काळात अभिवचन रजेवर जाऊन तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सुहास अनिल राखैरकार (वय 30, रा. अशोक नगर, पाटीपुरा, यवतमाळ) असे या आरोपीचे नाव असून, त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
कोविड काळात मिळालेल्या रजेचा गैरफायदा
अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदी क्रमांक C/5547 सुहास राखैरकार याला 28 जून 2022 रोजी कोविड अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र, नियोजित वेळेत परत न जाता तो फरार झाला. अमरावती कारागृह प्रशासनाने वारंवार त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9 मार्च 2025 रोजी अमरावती कारागृह प्रशासनाने यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला पत्र पाठवून आरोपीचा शोध घेण्याची विनंती केली. यानंतर पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, आरोपी यवतमाळच्या महात्मा फुले चौकात असल्याचे समजले. यावरून पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू आणि त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात
खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या सुहास राखैरकारला यापूर्वी अमरावती कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, फरारी असल्याने त्याचा शोध सुरू होता. पोलिसांनी त्याला अटक करून पुन्हा अमरावती मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सतिश चवरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, पोलीस अंमलदार सै. साजिद, बंडू डांगे, रुपेश पालो, योगेश डगवार, आकाश सूर्यवंशी, देवेंद्र होले, योगेश टेकाम आदींनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठे यश मिळाले असून, नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला आहे.