CrimeSocialSpecial

खाकीचा साईड बिझनेस : अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल, फोटो आणि नावे आली समोर..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी आपले मूळ कर्तव्य विसरले असून अतिरिक्त पैसा कमावण्याच्या नादात त्यांनी साईड बिझनेस सुरु केले आहे. बाहेरील इतर काही व्यवसाय, उद्योग किंवा नेटवर्क मार्केटिंग करून पैसे कमावण्याचा प्रयत्न पोलीस दादा करीत आहेत. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे असेच काही फोटो व्हायरल झाल्यानंतर जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी यासंदर्भात पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कर्मचारी शासकीय वाहनांचा गैरवापर करून साईड बिझनेस करत असल्याचे उघड झाले आहे. पाळधी ते एरंडोल दरम्यान पेट्रोल पंप, दुकाने आणि हॉटेल परिसरात हे कर्मचारी नागरिकांना हेरून वजन कमी करणे, वजन वाढविणारी उत्पादने आणि वेट लॉस क्लासेसची प्रचार-प्रसिद्धी करत असल्याचे समजले आहे. जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या या प्रकाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे.

इथे वाचा संपूर्ण तक्रार..
दिनेश भोळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, हर्बालाईफ (Herbalife) ही खाजगी कंपनी साखळी पध्दतीने (Multi Level Marketing ) ग्राहकांच्या माध्यमातून वजन वाढवा किंवा कमी करा, व इतर अशा विविध वस्तूंचा विक्री व्यवसाय करते. अशा प्रकारचे व्यवसाय व साखळी मार्केटिंग खाजगी व्यक्तीने करणे नैसर्गिक आहे. यास्तव, शासकीय कर्मचारी हे शिस्तीचे पालन करणारे म्हणून ओळखले जातात, तसेच पोलीस खाते हे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व कायदेशीर नियमांचे पालन करणारे खाते म्हणून ओळखले जाते. असे असताना जळगांव पोलीस दलाच्या आस्थापनेवर मूळ नियुक्तीने कार्यरत असलेले व सध्या प्रतिनियुक्तीने महामार्ग सुरक्षा विभाग, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाळधी जि.जळगांव येथील पोलीस अंमलदार संदिप पाटील, दिपक महाजन, भारत काळे, अशोक अभिमन पाटिल व अन्य एक हे कर्तव्यावर असतांना खाजगी कंपनीचे मार्केटिंग ( जोडधंदा ) करतांना आढळून आले व त्याबाबत त्यांचे व्हिडिओ व फोटो पुरावा म्हणून प्राप्त झाले आहेत.

सदरील कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती किंवा पत्नी यांच्या नावाने हे खाजगी साखळी मार्केटिंग ची नोंदणी करून (ID घेऊन) व्यवसाय (जोडधंदा) करत असल्याचे समजते. ज्याअर्थी एखादा कर्मचारी जर निलंबित झाला तर त्याला निलंबन काळात खाजगी व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात नमूद असते. याठिकाणी मात्र संबंधित कर्मचारी हे कर्तव्य बजावत असतांना शासकीय गणवेश परीधान करुन शासनाचे चार चाकी वाहन घेऊन स्वतः च्या फायद्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करुन खाजगी कंपनीचा मार्केटिंग व्यवसाय ( जोडधंदा ) करत प्रशासनाची फसवणूक करतांना दिसून येत आहे.

सदर पोलिस कर्मचारी संदिप पाटील, दिपक महाजन, भारत काळे, अशोक अभिमन पाटिल व अन्य एक कर्मचारी हे महामार्ग सुरक्षा केंद्र पाळधी यांच्या हद्दीत पेट्रोल पंपावर मार्केटिंग करतांना, सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय पिंपळकोठा बु|| ता. एरंडोल जि. जळगांव या ठिकाणी शाळेतील कर्मचाऱ्यांसोबत मार्केटिंग करतांना, तसेच महामार्गावरील ढाबा चालवणाऱ्या लोकांसोबत मार्केटिंग करतांना आणि महामार्गावरील हाॅटेल कृष्णा इन याठिकाणी हाॅटेलातील कर्मचारी व ग्राहकांसोबत मार्केटिंग करतांना आढळून आलेले आहेत व त्याबाबतीत आज रोजी फोटो व व्हिडिओ पुराव्याकामी सोबत जोडीत आहे.

पोलीस कर्मचारी संदिप पाटील याने हर्बालाईफ या चैन मार्केटिंग कंपनीत पत्नीच्या नावावर नोंदणी करुन स्वतः पोलीस प्रशासनातील अनेक लोकांना या व्यवसायासाठी ( जोडधंदा ) नोंदणीकृत करुन घेतलेले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्य बजावताना वरील कर्मचाऱ्यांनी वाहन धारकांना सुद्धा या चेन मार्केटिंग मध्ये गंडवल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब अतिशय गंभीर असून महाराष्ट्र पोलीसांच्या मूळ उद्देशास हरताळ फासणारी आहे.

तरी, माझी आपणांस या तक्रारीद्वारे विनंती आहे की, या सर्व कर्मचाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची तसेच बेहिशेबी मालमत्तेची सखोल व बारकाईने चौकशी करण्यात यावी तसेच यांनी कर्तव्यावर असतांना महामार्ग विभागाकडील वाहनाचा खाजगी ( जोडधंदा ) व्यवसायासाठी वापर केला गेला, त्या बाबत चौकशी होऊन तेवढ्या रकमेची त्यांच्या कडून वसूली करण्यात यावी. तसेच पोलीस दलाची प्रतीमा मलीन केल्याबाबत तात्काळ निलंबित करण्यात यावे व चौकशी अंती कायदेशीर तथा प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, हि विनंती.

पोलीस अधीक्षक कारवाई करणार?
जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीच्या घटना, पोलिसांचे व्हायरल फोटो आणि व्हिडिओ यामुळे चर्चेत असताना हा नवा प्रकार समोर आला आहे. काही पोलीस कर्मचारी आपले मूळ कर्तव्य विसरून अतिरिक्त कमाईसाठी बाह्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिनेश भोळे यांनी यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य मुंबई, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, ठाणे, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र नाशिक, पोलीस अधीक्षक, पोलिस अधीक्षक कार्यालय, जळगांव यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षक यासंदर्भात अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रकार गंभीर असून, पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. एकीकडे गुन्हेगारी डोके वर काढत असताना पोलिसांच्या अशा भूमिका आणि अंतर्गत गटबाजीला सांभाळण्याचे काम देखील अधिक्षकांना करावे लागत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button