मोटारसायकल चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडून उघड; चोरीची दुचाकी हस्तगत
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ताब्यात; न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी


महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला असून, चोरीची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शेरा चौक, रझा कॉलनी, मेहरुण परिसरातील रहिवासी रमजान खान बाबु खान यांनी त्यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH-19 DY 4874 ही दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता जळगाव-अजिंठा चौफुली येथील इदगाह कॉम्प्लेक्ससमोर पार्क केली होती. त्यानंतर ते वैयक्तिक कामासाठी गेले होते.
काम आटोपून परत आल्यानंतर पार्किंगच्या ठिकाणी मोटारसायकल आढळून आली नाही. परिसरात शोध घेऊनही दुचाकीचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक 738/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही, गोपनीय माहिती अन् तांत्रिक विश्लेषण
मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणाऱ्या संशयिताची ओळख निष्पन्न केली. त्यानंतर दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी संशयितास ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत त्याने आपले नाव तुलसीराम काल्यासिंग कास्दे (वय 28), मूळ रा. 83 झाकस, ता. भैसदेही, जि. बैतुल (मध्य प्रदेश), ह.मु. प्लॉट नं. 34, गट नं. 167/1, सुप्रीम कॉलनी, शारदा कॉलनी, शारदा शाळेजवळ, जळगाव असे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
चोरीची दुचाकी पोलिसांच्या ताब्यात
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH-19 DY 4874 हस्तगत केली आहे. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मराठे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.







