स्थगित केलेले आमरण उपोषण उद्यापासून पुन्हा सुरू करणार


स्थगित केलेले आमरण उपोषण उद्यापासून पुन्हा सुरू करणार
लेखी आश्वासनानंतरही मागण्यांवर कार्यवाही न झाल्याचा सोमचंद संदानशिव यांचा आरोप
अमळनेर, प्रतिनिधी : हॉटेल मिडटाऊन, मल्टिप्लेक्स तसेच पात्र पावतीधारक सफाई कामगारांना टाकरखेडा रस्त्यावरील म्हाडाच्या घरकुलांमध्ये घरे देण्यात यावीत, तसेच ठगुआई रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम पाडून डीपी रस्ता मोकळा करण्यात यावा, या मागण्यांसाठी सोमचंद संदानशिव यांनी १५ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते.
मुख्याधिकारी यांनी सर्व मागण्या एका महिन्यात पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर संदानशिव यांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, दिलेल्या लेखी आश्वासनानुसार अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या मागण्यांसाठी स्थगित केलेले आमरण उपोषण सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे संदानशिव यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.






