वरणगावात ५ लाखांचा गुटखा जप्त

वरणगावात ५ लाखांचा गुटखा जप्त
पोलीस अन् एफडीएची धडक कारवाई, इनोव्हासह तस्कराला बेड्या
वरणगाव : महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर वरणगाव पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली असून, ५ लाख १७ हजार ८६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तसेच गुटख्याची तस्करी करणारी सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार जप्त करून नशिराबाद येथील एका तस्कराला ताब्यात घेण्यात आले आहे. २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुक्ताईनगर–भुसावळ मार्गावरील कपिलवस्ती परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.
कपिलवस्ती परिसरात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वेढा धडून संशयित इनोव्हा कार (क्र. MH-20 BD-3000) अडवून तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विंग तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला, करमचंद प्रीमियम पानमसाला, केसी-१००० यासह विविध तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार आणि ५,१७,८६८ रुपयांचा प्रतिबंधित माल असा एकूण मोठा साठा हस्तगत केला असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सर्व पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहेत.
या प्रकरणी संशयित आरोपी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमान्वये वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी करीत आहेत.






