
कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळल्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश
जामनेर तालुक्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा अचानक दौरा; शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीची केली पाहणी
जळगाव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार, दि. ३० जुलै रोजी जामनेर तालुक्याचा अचानक दौरा करून विविध शासकीय कार्यालये व संस्थांची पाहणी केली. यावेळी वाकोद ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयीन वेळेत कुलूपबंद आढळून आल्याने संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
दौऱ्याची सुरुवात देवपिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या भेटीने झाली. शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विशेषतः निपुण भारत अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या निपुण चाचणीबाबत विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये मिसळत त्या थेट जमिनीवर बसल्या आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अध्ययन प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यांच्या या सहज व विद्यार्थीकेंद्रित संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर त्यांनी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन स्वच्छता, औषधसाठा तसेच रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, आरोग्य सुविधा अधिक सक्षम कराव्यात तसेच ग्रामीण नागरिकांना वेळेवर दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी वाकोद ग्रामपंचायत कार्यालयास अचानक भेट दिली. मात्र कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ग्रामपंचायत अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागरिकांना कार्यालयीन वेळेत नियमित व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.







