मेहरूण तलावात १६ ठिकाणांहून सांडपाणी; कायमस्वरूपी उपाययोजनांचे आदेश
गणेश विसर्जनापूर्वी दोन पंपहाऊस सुरू करण्याच्या सूचना; सांडपाणी रोखण्यासाठी ठेकेदाराने सादर केली ‘ब्ल्यू प्रिंट’

मेहरूण तलावात १६ ठिकाणांहून सांडपाणी; कायमस्वरूपी उपाययोजनांचे आदेश
गणेश विसर्जनापूर्वी दोन पंपहाऊस सुरू करण्याच्या सूचना; सांडपाणी रोखण्यासाठी ठेकेदाराने सादर केली ‘ब्ल्यू प्रिंट’
जळगाव : शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मेहरूण तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तलावात शहरातील गटारीचे सांडपाणी जाऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी तलावात तब्बल १६ ड्रेनेजमधून सांडपाणी जात असल्याची बाब समोर आली.
१६ ड्रेनेजचे पाणी तलावात
मेहरूण तलावात एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ ठिकाणांहून ड्रेनेजचे सांडपाणी सोडले जात असल्याने तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या तात्पुरत्या स्वरूपात न सोडविता कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
गणेश विसर्जनापूर्वी दोन पंपहाऊस सुरू करा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तलावाची स्वच्छता आणि पाण्याचा योग्य निचरा यासाठी दोन पंपहाऊस तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेश विसर्जनापूर्वी ही व्यवस्था कार्यान्वित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
ठेकेदाराकडून ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर
तलावात सांडपाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी संबंधित ठेकेदाराने बैठकीत ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर करून संपूर्ण नियोजनाची माहिती दिली. सांडपाण्याचा प्रवाह अडविणे, आवश्यक ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे आणि तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा यावेळी मांडण्यात आला.
‘सांडपाणी तलावात जाणे खपवून घेणार नाही’
तलावात गटारीचे पाणी जाणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, अशी कठोर भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. उपाययोजनांमध्ये विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश उपमहापौरांनी दिले. तसेच कामाची गुणवत्ता, नियोजनानुसार अंमलबजावणी आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण होते की नाही, यावर महापालिका प्रशासनाने काटेकोर लक्ष ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
आयुक्तांशी चर्चा करून निर्णय
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी म्हणाले, “मेहरूण तलावाचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर आहे. कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसला पाहिजे. गटारीचे पाणी तलावात जाणार नाही, यासाठी ठोस व्यवस्था तातडीने झाली पाहिजे. याबाबत आयुक्तांशीही चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.”
बैठकीस स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेवक नितीनभाऊ सपके, नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेवक अमरकाका जैन आणि नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.
मेहरूण तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.







