पावसाळ्यातील संभाव्य साथीच्या आजारांबाबत आरोग्य यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे

पावसाळ्यातील संभाव्य साथीच्या आजारांबाबत आरोग्य यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे निर्देश
जळगाव/प्रतिनिधी :- सध्या सुरू असलेला पावसाळा, वातावरणातील बदल तसेच त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या आणि संभाव्य साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून मिशन मोडवर काम करावे, व एच पी व्ही लसीकरण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवार दि. २५ जून रोजी आरोग्य विभागाची कार्यकारी सभा मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आकाश चौधरी , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल पाटील तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आरोग्य विभागाच्या विविध निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेतला. पावसाळ्याच्या कालावधीत दूषित पाणी, डासांची वाढ, वातावरणातील बदल आणि अस्वच्छतेमुळे विविध प्रकारचे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण भागासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी दक्ष राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा, सर्पदंशावरील प्रतिविष औषधे तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. ताप, अतिसार, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांच्या संशयित रुग्णांची तातडीने नोंद घेऊन उपचार व प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि आरोग्यविषयक जनजागृतीबाबत व्यापक प्रचार करावा, सोबतच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व एच पी व्ही लसीकरण मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावेळी दिले.





