लोकसहभागातून साकारेल ‘आरोग्यसंपन्न गाव’
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा


लोकसहभागातून साकारेल ‘आरोग्यसंपन्न गाव’
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा
जळगाव, प्रतिनिधी : ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर लोकसहभाग वाढविणे, समुदायामध्ये आरोग्यविषयक मालकीची भावना निर्माण करणे आणि स्थानिक प्रश्नांवर सामूहिक कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने झालेल्या या कार्यशाळेत वर्तनबदल संवाद, सहभागी पद्धती आणि Trigger Activities या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यस्तरीय मुख्य प्रशिक्षक तथा Action for Better Tomorrow Society, छत्तीसगडचे संचालक व प्रशिक्षक श्री. राजू गुट्टे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. पारंपरिक व्याख्यान पद्धतीऐवजी सहभागी व अनुभवाधारित प्रशिक्षणावर भर देण्यात आला. Ice Breaker Activities, Group Activities, Pair/Group Exercises, प्रश्नोत्तर, अनुभवाधारित चर्चा, परिस्थितीआधारित कृती आणि सामूहिक चिंतन अशा विविध उपक्रमांतून प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान माहिती देण्यापासून विचारप्रवर्तन, अनुभवातून जाणीव निर्माण करणे आणि कृतीसाठी प्रेरित करणे या प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. स्थानिक समस्या आणि गरजा समजून घेऊन त्यांच्या निराकरणात समुदायाला सक्रिय भागीदार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
Trigger Approach च्या माध्यमातून प्रश्न, अनुभव, संवाद, चिंतन आणि सहभागी कृती यांच्या आधारे समुदायाला आरोग्यविषयक विषयांवर स्वयंस्फूर्तपणे कृती करण्यासाठी प्रेरित करण्याच्या पद्धतीही स्पष्ट करण्यात आल्या. विविध उपक्रमांनंतर प्रशिक्षणार्थींशी चर्चा करून या पद्धती गावपातळीवर कशा वापरता येतील, यावर विचारविनिमय करण्यात आला.
तालुकास्तरीय कृती आराखडा
कार्यशाळेच्या पुढील सत्रात गोविंद मोरे व अक्षयकुमार राऊतवाड, PMU – ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान, आरोग्य भवन, महाराष्ट्र तसेच संबंधित अधिकारी व प्रशिक्षणार्थींनी गटचर्चा आणि Group Activitiesच्या माध्यमातून तालुकास्तरीय कृती आराखडा तयार केला. यामध्ये स्थानिक आरोग्यविषयक गरजा, प्राधान्यक्रम, उपलब्ध संसाधने, विविध विभागांची भूमिका, समुदायाचा सहभाग आणि संभाव्य अडचणींचा विचार करण्यात आला.
तयार केलेले कृती आराखडे संबंधित गटांनी सादर केले. या प्रक्रियेतून स्थानिक कल्पना, क्षेत्रीय अनुभव आणि अंमलबजावणीच्या शक्यतांची देवाणघेवाण झाली.
गावाचे आरोग्य हे केवळ सार्वजनिक आरोग्य विभागाचे दायित्व नसून ग्रामपंचायत, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, पाणी व स्वच्छता तसेच इतर संबंधित विभाग आणि स्थानिक समुदायाच्या समन्वित सहभागातून शाश्वत सुधारणा शक्य असल्याचे कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आले. लोकसहभाग, आंतरविभागीय समन्वय, समुदायाची मालकी, स्थानिक कृती आराखडा, नियमित आढावा, Monitoring, Documentation आणि Follow-up या बाबींवरही भर देण्यात आला.







