PoliticsSocial

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व यशवंतराव चव्हाण सेंटरचा संयुक्त उपक्रम; साहित्य, शेती-पाणी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

जळगाव/मुंबई | प्रतिनिधी

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेणारा कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार वितरण सोहळा २०२६ मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात साहित्य तसेच शेती-पाणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी परिवर्तन जळगाव निर्मित ‘हंस अकेला’ या संत कबीरांच्या विचारांचा वेध घेणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, डॉ. श्रीकांत देशमुख, सुधींद्र कुलकर्णी तसेच ना. धों. महानोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन दत्ता बाळसराफ यांनी केले. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

यावेळी साहित्य क्षेत्रातील पुरस्कारार्थी अविनाश उषा वसंत, मुंबई, श्रीकांत साव, चंद्रपूर, प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी आणि विठ्ठल खिलारी, सातारा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शेती-पाणी व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वैशाली पाटील, दसनूर, ता. रावेर, जि. जळगाव आणि सीमा क्षीरसागर, कडवंची, ता. जालना यांचा गौरव करण्यात आला.

वाचनातून वैचारिक प्रगल्भता

यावेळी मनोगत व्यक्त करताना साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी साहित्य, वाचन आणि वैचारिक प्रगल्भतेचे महत्त्व अधोरेखित केले. लेखकाच्या व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता निर्माण होण्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक असून ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी त्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जीवनातील संकटांवर मात करून इतर महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. ही चित्रफीत पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले.

सामाजिक परिस्थितीचा वेध घेणे आवश्यक

डॉ. श्रीकांत देशमुख यांनी लेखक आणि संशोधकांनी आपल्या लेखनातून व संशोधनातून वर्तमान सामाजिक परिस्थितीचा वेध घेत ठोस सामाजिक भूमिका मांडली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

‘हंस अकेला’मधून कबीरांचा विचार जागवला

परिवर्तन जळगावच्या कलाकारांनी ‘हंस अकेला’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून संत कबीरांचे जीवन, विचार आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडला. ‘घुंगट के पट खोल रे’, भक्ती परंपरेची ताकद आणि वारकरी परंपरा, ‘शून्य गड सर बस्ती कौन सोता कौन जागे है’, नाथ परंपरा, ‘सुनता है गुरु ज्ञानी’, संत नामदेव यांची पंढरपूर ते घुमान यात्रा, ‘घट घट में पंछी’, ‘कोई नहीं अपना समझना’ यासह विविध दोहे व सादरीकरणातून कबीरांच्या विचारविश्वाचा वेध घेण्यात आला.

गोविंद मोकाशी, पांडुरंग पाटील, श्रद्धा कुलकर्णी, वरुण नेवे, अंजली धुमाळ, रोहित बोरसे, यश महाजन, सुनीला भोलाने, अक्षय नेहे, हर्षल पाटील यांच्यासह परिवर्तनच्या कलाकारांनी सादरीकरण केले. शंभू पाटील यांनी विवेचन केले.

साहित्य, शेती, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा पुरस्कार सोहळा आणि ‘हंस अकेला’चा सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button