सौंदाणे येथील किराणा दुकानातून ८ किलो ९२० ग्रॅम गांजा जप्त, एकाला अटक

सौंदाणे येथील किराणा दुकानातून ८ किलो ९२० ग्रॅम गांजा जप्त, एकाला अटक
नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
नाशिक प्रतिनिधी I नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावच्या शिवारात एका किराणा दुकानावर छापा टाकला. या कारवाईत ८ किलो ९२० ग्रॅम वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाइल फोन आणि गांजा सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या ५० चिलम असा एकूण २,००,७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी निलेश बापू पवार (वय ३०, रा. इंदिरानगर, सौंदाणे, ता. मालेगाव) याला अटक करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि वितरणाला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार सतर्क कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना १५ ऑक्टोबर २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, सौंदाणे गावच्या शिवारातील इंदिरानगर परिसरात श्रीगणेश किराणा दुकानातून गांजाची अवैध विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी श्वान पथकासह दुकानावर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान निलेश बापू पवार हा गांजाची अवैध विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून १,७८,४०० रुपये किंमतीचा ८ किलो ९२० ग्रॅम गांजा, १०,००० रुपये रोख, एक मोबाइल फोन आणि गांजा सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या ५० चिलम जप्त करण्यात आल्या. एकूण मुद्देमालाची किंमत २,००,७०० रुपये आहे.
कायदेशीर कारवाई आणि अटक निलेश पवार याच्याविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७६५/२०२५ अंतर्गत गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(क), २०(ब), २०(१)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.
पोलीस पथकाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) श्री. तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. प्रितम चौधरी, पोउनि सुदर्शन बोडके, पोलीस कर्मचारी विनोद टिळे, सतीश घुटे, आबा पिसाळ, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सपोनि प्रिती सावंजी, पोउनि तुषार भदाणे, पोउनि दामोधर काळे, पोहवा किरण पाटील, तसेच अंमली पदार्थ विरोधी श्वान पथकातील सपोउनि उगले, पोहवा बोरसे, कडाळे, जोपळे आणि श्वान शेरा यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पोलिसांचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा कारवायांमुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.






