स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी देण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीतील लाभार्थ्याच्या २५ टक्के हिस्स्यामधील जास्तीत जास्त १५ टक्के मार्जिन मनी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येते. लाभार्थ्याने १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि बँकेकडून स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी शासनाकडून देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांनी अर्ज सादर करावेत,अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.







