जळगावात गुटखा माफियांवर ‘हल्लाबोल’, लाखोंचा साठा जप्त, ६ गुन्हे दाखल
गुटखामाफियांना थेट इशारा : जिल्ह्यात कारवाया आणखी तीव्र होणार

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अन्न व औषध प्रशासन विभागाने जळगाव शहर व परिसरात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात मोठी धडक कारवाई करत विक्रेते व घाऊक पुरवठादारांवर अंकुश आणण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात विविध ठिकाणी छापे टाकून एकूण ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न विभागाचे संयुक्त आयुक्त मंगेश माने व सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ एप्रिल रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. एचडीएफसी बँक व कालिंका माता मंदिराजवळील परिसरातून रविंद्र राऊत व राजेंद्र भावसार यांच्या ठिकाणाहून राजनिवास, विमल, करमचंद यांसारख्या प्रतिबंधित पान मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण सुमारे ६,७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दोन दुकानातून लाखोंचा गुटखा जप्त
२० एप्रिल रोजी पिंप्राळा परिसरातील इंद्रनील हाउसिंग सोसायटीमध्ये मोठी कारवाई करत सुरेश नरवाडे याच्याकडून तब्बल १ लाख ६६ हजार ७१९ रुपयांचा गुटखा, तंबाखू व जर्दा साठा जप्त करण्यात आला. तसेच २१ एप्रिल रोजी जिहापेठ परिसरातील एस.एस.डी. किराणा दुकानावर छापा टाकत दोन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. या ठिकाणी विविध प्रकारचे २५ प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे १ लाख ४८० रुपये आहे.
वेगवेगळे ६ गुन्हे दाखल
या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी अमोल जगताप, पद्मजा कढरे, के.ए.सालुंके व इतर पथकांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. दरम्यान, अमळनेर येथे ३५०० रुपये तर एरंडोल येथे १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
कारवाया आणखी तीव्र होणार
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी सांगितले की, “गुटखा व प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. ही मोहीम पुढेही सुरूच राहणार आहे. या धडक कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.






