पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ अभियानाचा शुभारंभ

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ अभियानाचा शुभारंभ
१०० आठवड्यांत एक कोटीहून अधिक युवकांपर्यंत नशामुक्तीचा संदेश; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा सहभाग
जळगाव | बुलढाणा | नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवी दिल्लीतील इस्कॉन मंदिरात ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ या राष्ट्रव्यापी संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. विकसित भारत @२०४७ या संकल्पनेला बळ देण्यासाठी व्यसनमुक्त, सशक्त आणि जबाबदार युवा शक्ती घडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या १०० आठवड्यांच्या जनआंदोलनात देशभरातील युवकांना सहभागी करून घेण्याचा निर्धार करण्यात आला.


या शुभारंभ कार्यक्रमाला केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या. तसेच MY Bharat चे कम्युनिकेशन डायरेक्टर बृजेंद्र नंदन, युवा कार्य विभागाचे संयुक्त सचिव शिव रतन, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), MY Bharat, विविध आध्यात्मिक संस्था, युवक मंडळे, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
देशभरातील २८ हजारांहून अधिक केंद्रांवर सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी माध्यमातून देशभरातील २८ हजारांहून अधिक ठिकाणांवरील युवकांना संबोधित केले. व्यसनमुक्त युवा शक्ती ही विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचे सांगत त्यांनी युवकांना या अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन केले. देशभरातील १२५ हून अधिक आध्यात्मिक संस्था, MY Bharat, NSS स्वयंसेवक, युवक मंडळे आणि सामाजिक संस्थांनी अभियानात सहभाग नोंदविला.
रक्षा खडसे यांचे आवाहन
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी युवक, स्वयंसेवक आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. व्यसनमुक्त भारतासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, युवकांनी समाजपरिवर्तनाचे नेतृत्व स्वीकारून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जळगाव व बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ अभियानाला जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. MY Bharat आणि स्थानिक भागीदार संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. युवक, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत व्यसनमुक्त भारताचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एन. व्ही. चिन्मय विद्यालयात झालेल्या प्रमुख कार्यक्रमात सुमारे ३८० विद्यार्थी व युवक सहभागी झाले. तसेच नंद फाऊंडेशन सभागृहात आयोजित कार्यक्रमात २६० युवकांनी सहभाग नोंदविला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.
एक कोटी युवकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
या अभियानांतर्गत पुढील १०० आठवड्यांत देशातील एक कोटीहून अधिक युवकांपर्यंत नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. MY Bharat, NSS, युवक मंडळे, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून देशभर जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, “‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ हे केवळ व्यसनमुक्तीचे अभियान नसून विकसित भारत @२०४७ च्या संकल्पपूर्तीसाठी युवकांना राष्ट्रनिर्मितीचे सक्रिय भागीदार बनविणारे व्यापक जनआंदोलन आहे. नशामुक्त युवा शक्ती ही विकसित भारताचा भक्कम पाया आहे.”







