Other

‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर बालकलाकारांची बहारदार सादरीकरणे

‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर बालकलाकारांची बहारदार सादरीकरणे
बालरंगभूमी परिषद व व.वा. जिल्हा वाचनालयाचा उपक्रम; हृदया चव्हाण, वैष्णवी पाटील आणि ललिता वाणी विद्यालय प्रथम

जळगाव | प्रतिनिधी

मराठी बालनाट्य दिनानिमित्त बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि व.वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या विशेष स्पर्धेला बालकलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या स्पर्धेचा विषय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य’ असा ठेवण्यात आला होता.

बालकांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी, वाचनाची प्रेरणा मिळावी आणि स्वतः संहिता तयार करून अभिनयातून इतिहास सादर करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विविध कलाप्रकारांतून अहिल्यादेवींचे कार्य उलगडले

स्पर्धेत सहभागी बालकलावंतांनी नाट्यछटा, स्वगत, नाटुकले, पोवाडा, गीतगायन आणि एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचे प्रभावी सादरीकरण केले. ज्येष्ठ कलावंत प्रतिमा धर्माधिकारी-याज्ञिक आणि सचिन महाजन यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. यावेळी व.वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल शहा, सदस्य महेश गोरडे, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार-गुजराथी आणि कोषाध्यक्ष सचिन महाजन उपस्थित होते.

तीन गटांत रंगली स्पर्धा

स्पर्धेत ५ ते १० वर्षे वयोगटातील १०, ११ ते १५ वर्षे वयोगटातील १५ बालकलाकार आणि समूह गटातील ७ संघांनी सहभाग घेतला.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :

एकल (५ ते १० वर्षे) :

  • सर्वोत्कृष्ट : हृदया अनिल चव्हाण (चाळीसगाव)
  • उत्कृष्ट : गायत्री अशोक पवार
  • उत्तम : महेश्वरी योगेश पाटील
  • प्रशंसनीय : ईशिका शरीफ तडवी

एकल (११ ते १५ वर्षे) :

  • सर्वोत्कृष्ट : वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील
  • उत्कृष्ट : साक्षी अनिल पाटील
  • उत्तम : गौरवी महेंद्रसिंग राजपूत
  • प्रशंसनीय : चैताली सुभाष चव्हाण

समूह गट :

  • सर्वोत्कृष्ट : ललिता वाणी माध्यमिक विद्यालय, जळगाव
  • उत्कृष्ट : कमल वाणी बालनिकेतन विद्यालय, जळगाव

महाअंतिम फेरीची संधी

विजेत्या बालकलाकारांना प्रमाणपत्रासह व.वा. जिल्हा वाचनालयाचे एक वर्षाचे निःशुल्क सभासदत्व प्रदान करण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट ठरलेल्या स्पर्धकांना ९ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत सादरीकरणाची संधी मिळणार आहे. सर्व सहभागी बालकलाकारांनाही सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे सुदर्शन पाटील, हर्षल पवार, दर्शन गुजराती, ज्ञानेश्वर सोनवणे, अवधूत दलाल, भालचंद्र पाटील तसेच व.वा. जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button