जळगावात ६२.०७ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; ३.५८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगावात ६२.०७ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; ३.५८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थासह ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या सेक्टर एच-१४ समोरून एका व्यक्तीकडून दुचाकीवरून मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या परवानगीने ३१ जुलै रोजी रात्री सापळा रचण्यात आला.
आरोपीला दुचाकीसह ताब्यात
कारवाईदरम्यान इम्रान खान हयात खान (वय ३६, रा. आव्हाणे, सध्या फातेमा नगर, जळगाव) याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. राजपत्रित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), एक रियलमी कंपनीचा मोबाईल आणि एमएच-१९/ए-क्यू-३३५४ क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २ लाख ८८ हजार रुपये किमतीचे एमडी, २० हजार रुपयांचा मोबाईल आणि ५० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.
मालेगाव येथून आणल्याची कबुली
प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त केलेला पदार्थ मेफेड्रॉन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशीत आरोपीने हा अंमली पदार्थ रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
याप्रकरणी इम्रान खान हयात खान आणि रफीक उर्फ गोल्डन या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संयुक्त पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस, फॉरेन्सिक पथक, शासकीय पंच आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.







