Other

पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

जळगाव, दि. ३ : जळगाव शहरालगत पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचला होता. या पुलाची राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलाच्या संरचनेला झालेल्या नुकसानीची आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी संबंधित यंत्रणेला नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.

पाहणीदरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या पुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ पथक पाठविण्यात यावे, नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दुरुस्तीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच नागरिकांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुलाच्या परिसरातील परिस्थिती, वाहतुकीवरील परिणाम तसेच प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचेही यावेळी सांगितले. जळगावचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी तहसीलदार शितल राजपूत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button