कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांचे दर्शन; दोन तासांत ३३ अभिषेक
जळगाव (प्रतिनिधी) : निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राच्या पर्वानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मंदिराचे द्वार उघडण्यात आले. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेपर्यंत सुमारे ५० हजारांहून अधिक भाविकांनी भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मंदिराचे द्वार उघडल्यानंतर रात्री ९.३० ते ११.३० या दोन तासांत तब्बल ३३ अभिषेक करण्यात आले. मंदिराच्या अध्यक्षा वासंती अय्यर आणि पुजारी कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमूर्ती पाठक गुरुजी गोविंद तिवारी यांनी मंत्रोच्चारात पूजाविधीला प्रारंभ केला. यावेळी केरळी महिला ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त स्थानिक नगरसेवक, अतुल जैन, सीतारामदादा सोनवणे यांच्यासह आजी-माजी आमदार आणि खासदारांनीही मंदिरात येऊन भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.
दोन किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी रांगा
यंदा कृत्तिका नक्षत्राचा शुभयोग अधिक काळ असल्याने दर्शनासाठी भाविकांचा उत्साह दिसून आला. मंदिर परिसरापासून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अभिषेकासाठी मंदिरासमोर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना धार्मिक मार्गदर्शनही करण्यात येत होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कपाळावर टिळा लावून त्यांना चण्याचा प्रसाद देण्यात आला.
अनेक भाविक नवस फेडण्यासाठी मंदिरात आले होते. भगवान कार्तिक स्वामींच्या दर्शनाने मनाला समाधान, सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती मिळते, अशी भावना काही भाविकांनी व्यक्त केली.
२४ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजता मंदिराचे द्वार बंद करण्यात आले. संपूर्ण उत्सवादरम्यान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे आणि पूजाविधी व्यवस्थित पार पडावेत, यासाठी केरळी महिला ट्रस्टच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.







