Crime

अमळनेरमध्ये बनावट बांधकाम परवानग्यांचा पर्दाफाश; ६० ते ७० प्रकरणे उघडकीस

फोटोशॉपच्या माध्यमातून परवानग्या व पावत्या तयार करून नगरपरिषदेसह नागरिकांची फसवणूक; दोषींविरुद्ध फौजदारी कारवाईचा नगराध्यक्षांचा इशारा

अमळनेरमध्ये बनावट बांधकाम परवानग्यांचा पर्दाफाश; ६० ते ७० प्रकरणे उघडकीस

फोटोशॉपच्या माध्यमातून परवानग्या व पावत्या तयार करून नगरपरिषदेसह नागरिकांची फसवणूक; दोषींविरुद्ध फौजदारी कारवाईचा नगराध्यक्षांचा इशारा

अमळनेर I महा पोलीस न्यूज : शहरात बांधकाम परवानग्यांच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून नगरपरिषद आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही खासगी अभियंत्यांनी फोटोशॉपच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या अधिकृत परवानग्यांमध्ये फेरफार करून बनावट बांधकाम परवानग्या आणि चलन पावत्या तयार केल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत अशा प्रकारची ६० ते ७० प्रकरणे निदर्शनास आली असून आणखी प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील संबंधित दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी दिली.

शहरातील काही नवोदित खासगी अभियंत्यांनी नागरिकांकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, संबंधित नागरिकांचे अर्ज नगरपरिषदेत सादर न करता तसेच अधिकृत प्रक्रिया पूर्ण न करताच स्कॅन केलेल्या परवानग्यांमध्ये फोटोशॉपद्वारे बदल करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर ही कागदपत्रे अधिकृत असल्याचे भासवून नागरिकांना देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

परवानगी ऑनलाइन पोर्टलवर दिसेना अन् प्रकार उघड

काही नागरिक बांधकाम परवानगीसंदर्भातील कामासाठी नगरपरिषदेत गेले असता, त्यांच्या नावाने देण्यात आलेल्या परवानग्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध नसल्याचे आढळून आले. यामुळे संशय निर्माण झाला. नगरपरिषद प्रशासनाने चौकशी केली असता एका खासगी अभियंत्याने मूळ परवानगी आणि पावतीमध्ये फोटोशॉपच्या साहाय्याने फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अशाच प्रकारे तयार करण्यात आलेल्या अन्य कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून कर्ज

या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून बनावट बांधकाम परवानग्या आणि पावत्यांचा वापर करून काही नागरिकांनी बँकांकडून कर्ज मिळविल्याचेही समोर आले आहे. नगरपरिषदेच्या अधिकृत प्रक्रियेला बगल देऊन नागरिकांकडून पैसे स्वीकारण्यात आले आणि संबंधित रक्कम स्वतःकडे ठेवल्याचा आरोप खासगी अभियंत्यांवर करण्यात येत आहे. या प्रकारामुळे नगरपरिषदेच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांचीही आर्थिक फसवणूक झाली आहे.

क्यूआर कोडद्वारे परवानग्यांची पडताळणी

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांसाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. यापुढे बांधकाम परवानग्यांची सत्यता तपासण्यासाठी क्यूआर कोड प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकाराची माहिती बँकांनाही देण्यात येणार असून त्यांना अधिकृत परवानग्यांची खातरजमा करण्याबाबत पत्र पाठविले जाणार आहे.

नागरिकांनी आपल्याकडे असलेली बांधकाम परवानगी अधिकृत बीपीएमएस प्रणालीवर नोंदविण्यात आली आहे की नाही, याची खात्री करावी. अधिकृत प्रणालीवर नोंद नसलेली परवानगी ग्राह्य धरली जाणार नसल्याने नागरिकांनी आपल्या परवानग्यांची पडताळणी करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात येणार आहे.

अभियंते आणि दलालांची चौकशी करण्याची मागणी

दरम्यान, नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत शहरात सर्वेक्षण करून बनावट परवानग्या घेतलेल्या नागरिकांकडून संबंधित अभियंत्यांची नावे आणि माहिती संकलित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच नगरपरिषदेकडे आवश्यक शुल्क न भरता परस्पर बनावट परवानग्या मिळविणाऱ्या नागरिकांचीही चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

दोषींना पाठीशी घालणार नाही : नगराध्यक्ष

नगरपरिषद आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणातील सर्व संबंधित अभियंते आणि दलालांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध नियमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. यासंदर्भात मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंत्यांना आवश्यक आदेश देऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी स्पष्ट केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button