दुष्काळाच्या संकटात ८७ हजार शेतकऱ्यांना दिलासा; शेततळे योजनेतील सर्व प्रतीक्षा अर्ज मंजूर
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ३० दिवसांची मुदत

दुष्काळाच्या संकटात ८७ हजार शेतकऱ्यांना दिलासा; शेततळे योजनेतील सर्व प्रतीक्षा अर्ज मंजूर
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ३० दिवसांची मुदत
जळगाव, प्रतिनिधी : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने वैयक्तिक शेततळे योजनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महा-डीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड करण्यात आली असून, राज्यातील ८७ हजार १७४ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
पर्जन्याधारित शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता वाढवून संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून अनुदान तत्त्वावर वैयक्तिक शेततळे योजना राबविण्यात येते. शेततळ्यांमुळे पाण्याची साठवणूक करून शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यास मदत होते. सन २०२६-२७ मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने या योजनेवर विशेष भर दिला आहे.
प्रवर्गनिहाय शेतकऱ्यांची निवड
महा-डीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या शेतकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ३ हजार ९२५, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५ हजार ३७९ आणि इतर प्रवर्गातील ७७ हजार ८७० शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशा एकूण ८७ हजार १७४ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कागदपत्रांसाठी ३० दिवसांची मुदत
निवड झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे महा-डीबीटी (आपले सरकार) पोर्टलवर अपलोड करण्याबाबत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात आले आहेत. यामध्ये हमीपत्र (परिशिष्ट-२), तसेच आवश्यकतेनुसार जातीचा दाखला किंवा दिव्यांग प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी संदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. कागदपत्रे स्पष्ट आणि अद्ययावत असणे आवश्यक असून, विहित मुदतीत ती अपलोड न केल्यास संबंधित शेतकऱ्यांची निवड रद्द केली जाणार आहे.
पूर्वसंमतीनंतर काम पूर्ण करणे आवश्यक
योजनेच्या पुढील टप्प्यांबाबत शेतकऱ्यांना मोबाईल संदेश तसेच महा-डीबीटी पोर्टलद्वारे सूचना दिल्या जाणार आहेत. निवडीनंतर पूर्वसंमती मिळाल्यावर योजनेतील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून विहित मुदतीत शेततळ्याचे काम पूर्ण करणारे शेतकरीच अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.
त्यामुळे निवड झालेल्या शेतकऱ्यांनी मुदतीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून पुढील कार्यवाही पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.







