
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे आवाहन
जळगाव, प्रतिनिधी): मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरावा, यासाठी पात्र पशुपालक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या जनजागृतीसाठी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन (CCIF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद जळगावच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरूवार दि १६ रोजी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी शेतीसमोरील हवामान बदल, एल-निनोचा परिणाम, मजुरांची टंचाई, जमिनीचा खालावत चाललेला पोत, घटती उत्पादकता तसेच ओला व सुका दुष्काळ यांसारख्या आव्हानांचा उल्लेख केला. पशुधनाची संख्या घटल्याने नैसर्गिक शेतीवर विपरीत परिणाम होत असून रासायनिक खतांवरील अवलंबित्व वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पशुधन योजना नैसर्गिक, विषमुक्त आणि शाश्वत शेतीला बळ देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी मुख्यमंत्री पशुधन योजनेला जळगाव जिल्ह्यातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उपस्थितांचे आभार मानले. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा प्रभावी स्रोत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे त्यांनी सांगितले.
मुख्य प्रशिक्षक डॉ. संतोष उमाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पशुधन योजनेची सविस्तर माहिती देताना, ही योजना क्लस्टर पद्धतीने व सहकाराच्या माध्यमातून राबविल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असे सांगितले. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजित प्रशिक्षणाचा नियमित लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. विविध कार्यकारी सहकारी संस्था, दूध संघ, अटल पणन संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून पशुपालन अधिक सक्षम करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी रवींद्र अमृतकर यांनी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची आणि सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासन व पशुसंवर्धन विभागाचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, खासदार स्मिता वाघ तसेच पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामस्वामी यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.
योजना अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी मागेल त्याला पशुधन योजनेचा लाभ मिळावा तसेच समूहाच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय उभारणाऱ्या पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाने पशुपालनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला नवी दिशा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतीचा खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना, सौरऊर्जेवरील लघु कोल्ड स्टोरेज, सोलर डिहायड्रेशन, मूल्यवर्धन, प्रशिक्षण व ग्रामीण उद्योजकता विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पशुधनवाढ, नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि शेतकऱ्यांना शाश्वत पूरक उत्पन्न उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, कृषिभूषण समाधान पाटील, विकास दूध संघाचे शैलेश मोरखडे, तापी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रामदास कोळी, माजी कृषी संचालक अनिल भोकरे यांच्यासह विविध कार्यकारी सहकारी संस्था, दूध संघ, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने पशुपालक शेतकरी उपस्थित होते. तापी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रामदास कोळी, अविनाश खडके, पंढरीनाथ इंगळे, गिरीश वराडे, समीर पाटील आणि विवेक सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.






