विधानमंडळात आमदार राजूमामांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज
गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा सभागृहात प्रभावीपणे मांडला

विधानमंडळात आमदार राजूमामांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज
गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा सभागृहात प्रभावीपणे मांडला
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे जळगाव शहराशी संबंधित विविध प्रलंबित आणि जनहिताचे प्रश्न सभागृहात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले.
यामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २ हजार ३६८ गाळेधारकांच्या भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न, फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी तसेच महानगरपालिकेतील रिक्त पदांची तातडीने भरती या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.
आमदार राजूमामा यांनी सांगितले की, जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न सन २०१२ पासून रेडीरेकनर दर निश्चितीमुळे प्रलंबित आहे. हा प्रश्न हजारो व्यापाऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेला आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. नगरविकास विभागानेही त्यानुसार कार्यवाही करण्यास सांगितले असतानाही अद्याप प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला नसल्याने गाळेधारकांचा प्रश्न रखडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. व्यापाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मनपाने तातडीने प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी जळगाव शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक आणि लघु व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी तसेच स्वतंत्र व्हेंडिंग झोन विकसित करण्याची गरजही अधोरेखित केली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याने त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जळगाव महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे नमूद करत सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन नोकरभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली.
जळगाव शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी यावेळी दिली.






