Politics

गोंडगाव प्रकरणावरून भाजप-शिवसेना आमनेसामने; आरोपांना शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर

गोंडगाव प्रकरणावरून भाजप-शिवसेना आमनेसामने; आरोपांना शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर

भडगाव प्रतिनिधी

गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणावरून भडगावमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. भाजपने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.

नगरपरिषद गटनेते लखीचंद पाटील यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावत, गोंडगाव प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधीला न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. “या प्रकरणाचा आमदार किशोर पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रियेवर कोणाचाही प्रभाव पडू शकत नाही. त्यामुळे आमदारांवर करण्यात येणारे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून, त्यामागे केवळ राजकीय हेतू आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत, विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी एका अत्यंत संवेदनशील आणि न्यायप्रविष्ट प्रकरणाचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “गोंडगाव प्रकरणाला तीन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरच भाजप नेत्यांना अचानक जाग कशी आली? या काळात ते कुठे होते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्यांवरच आता आरोप करून भाजप केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.

शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना लखीचंद पाटील म्हणाले की, गोंडगाव प्रकरणातील पीडित मुलीला न्याय मिळावा, हीच शिवसेनेची ठाम भूमिका आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर पक्षाचा पूर्ण विश्वास असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबासोबत शिवसेना आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे असून, न्याय मिळेपर्यंत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दरम्यान, गोंडगाव प्रकरणावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असून, संवेदनशील प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. मात्र, पीडितेला न्याय मिळणे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखणे हेच सर्वात महत्त्वाचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button