भडगावला संत सेना महाराज मंदिरात आषाढी एकादशी साजरी!

भडगावला संत सेना महाराज मंदिरात आषाढी एकादशी साजरी!
भडगाव:(प्रतिनिधी )येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने शिवाजीनगर भागातील श्री विठ्ठल-रुक्मिणी व संत सेना महाराज मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.उत्सवानिमित्त मंदिरात ह.भ.प. लक्ष्मण खैरनार याच्या भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी सादर केलेल्या विविध भजनांनी उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. पत्रकार संजय पवार यांनी “भरला तुझा दरबार” हा अभग सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
याच दरम्यान शालेय बाल विद्यार्थ्यांच्या दिंडीचे मंदिरात आगमन झाल्याने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. दुपारी १२ वाजता मंडळाचे अध्यक्ष संजय पवार व सचिव ॲड. भरत ठाकरे यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यास पोलीस निरीक्षक महेश टाक, आमदार किशोर पाटील यांचे ज्येष्ठ बंधू तथा आदर्श ॲग्रो एजन्सीचे संचालक आण्णासो राजू पाटील, नगरसेवक देवाजी अहिरे आणि चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र अहिरे, गोविंद राजपुत यांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी नाभिक मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), सचिव ॲड. भरत ठाकरे, कार्यकारिणी सदस्य सुभाष ठाकरे, किशोर निकम, भगवान नेरपगारे, नामदेव चव्हाण, सूर्यभान वाघ, अशोक सोनवणे, निलेश महाले (पत्रकार), प्रभाकर नेरपगारे, गोरख वेळीस, भगवान चव्हाण, भास्कर पवार, सदिप पवार, पुजारी संदीप वाघ यांच्यासह नाभिक समाजातील बांधवांनी विशेष परिश्रम घेतले






