हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण
श्री मंगळग्रह मंदिरातून वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले सपत्नीक पूजन

हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण
श्री मंगळग्रह मंदिरातून वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले सपत्नीक पूजन
अमळनेर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला. वारकरी संप्रदायातील भक्तिपरंपरेचा आणि संतांच्या समतेच्या संदेशाचा प्रत्यय देणाऱ्या या सोहळ्याने भाविकांच्या मनात अध्यात्माची नवऊर्जा संचारली.
दिंडीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राजदंडाला स्पर्श करीत मंत्रोच्चारात दिंडीचे पूजन केले व भगव्या पताकेला वंदन करून दिंडीला खांदा दिला. त्यानंतर त्यांनी हातात टाळ घेऊन काही वेळ दिंडीत सहभाग नोफ्लदवत आनंदही घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली. यावेळी त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार प्रशांत धमके, तसेच महसूल प्रशासनाचे पुरुषोत्तम पाटील, टी. सी. धनराळे यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार, मंदिराचे सेवेकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी घुगे यांनी श्री मंगळग्रह मंदिरात सपत्नीक पूजा-अर्चा करून संकल्प सोडला. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. महाले यांनी त्यांचा सपत्नीक यथोचित सन्मान केला.

तत्पूर्वी, श्री मंगळग्रह मंदिरात पहाटेच श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री मंगळग्रह देवतेची विधिवत पूजा, अभिषेक आणि महाआरती झाली. त्यानंतर वैष्णव परंपरेचे प्रतीक असलेली पताका, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठलाच्या प्रतिमेसह दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरेल संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. मंदिराचे सेवेकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला.
दिंडीदरम्यान संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सामूहिक गायन करण्यात आले. ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या नामघोषांनी संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला. वारकरी संप्रदायाने जपलेली समता, सेवा, प्रेम, संयम आणि ईश्वरनिष्ठा यांचा संदेश दिंडीतून समाजापर्यंत पोहोचला. विठ्ठलभक्ती ही केवळ उपासना नसून ती माणसाला माणुसकी, सेवाभाव आणि सदाचाराकडे नेणारी जीवनपद्धती आहे, याची प्रचिती या सोहळ्यातून सर्वांना आली.
दिंडी मार्गातील पैलाड परिसर, चोपडा नाका या ठिकाणी भाविकांनी दिंडीचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दगडी दरवाजा ते सराफ बाजार, वाडी संस्थानापर्यंत दिंडीतील सेवेकऱ्यांनी हरिपाठ म्हटला तसेच फुगडी खेळली. भक्तिभावाने नटलेली ही दिंडी संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात पोहोचल्यावर तेथे संस्थानाचे विश्वस्त तथा पुरोहित जय देव व सेवेकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे देवांच्या मूर्तींना राजदंडाचा स्पर्श करून हरिपाठ, महाआरती आणि विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर दिंडी पुनश्च श्री मंगळग्रह मंदिरात परतली.
आषाढी एकादशीच्या या पावन सोहळ्याने भक्ती, श्रद्धा, सेवा आणि समर्पण यांचा अद्वितीय संगम घडवून आणला. श्री मंगळग्रह मंदिरातून निघालेली ही दिंडी केवळ वाडी संस्थानापर्यंतचा प्रवास नव्हती, तर प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणातील विठ्ठलभक्तीला जागविणारी, संतपरंपरेचा गौरव करणारी आणि समाजात अध्यात्माचा सुगंध दरवळविणारी एक मंगल यात्रा ठरली.
श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमळनेरसह परिसरातील भाविकांनी श्री मंगळग्रह देवतेच्या दर्शनासाठी रिमझिम पाऊस सुरू असताना शनिवारी, दि. २५ जुलै रोजी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी भाविकांनी दिंडीतही काही वेळ सहभाग नोफ्लदवत भक्तीचा संगम घडविल्याचे चित्र आज या परिसरात दिसून आले. आषाढी एकादशीच्या पावन पर्वात मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरातील या भाविकांच्या मांदियाळीमुळे श्री मंगळग्रह मंदिरात अध्यात्माचा मंगल सुगंध दरवळल्याची अनेकांना अनुभूती आली.






