बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव,(प्रतिनिधी): स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘बोलावा विठ्ठलं’ या कार्यक्रमाला जळगावकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भर पावसातही कांताई सभागृहात विठ्ठलनामाचा गजर, चिमुकल्यांचा उत्साह आणि भक्तिमय स्वर पंढरी अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत साकारलेल्या पालखी-दिंडी व रिंगण सोहळ्याने झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. वारीतील पारंपरिक खेळांचे सादरीकरण करताना चिमुकल्यांनी पावलीचा ताल, फुगडी आणि रिंगण यांचे मनोहारी सादरीकरण केले. भर पावसातही त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि लयबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर विद्यार्थ्यांनी विविध भक्तिगीते, अभंग आणि विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेली सादरीकरणे करून विठ्ठलाची आराधना केली. नृत्यांगन अँकडमीच्या विद्यार्थींनी विठ्ठला ये रे या गाण्यावर विशेष कथ्थक रचना सादर केले.
वरूण नेवे याने ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम… या गजराने सुरुवात केली. ‘येऊ विठ्ठल माझे माऊली’…, यासह एकाहून एक अभंग गायले. चिमुकल्या कलाकारांनी केलेले निवेदन, साथसंगत आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली . यावेळी कॅप्टन मोहन कुलकर्णी, चांदोरकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, सचिव अरविंद देशपांडे, उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर उपस्थित होते. ऐश्वर्या परदेशी यांनी गुरुवंदना सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चांदोरकर प्रतिष्ठान च्या नुपुर खटावकर, चिन्मय खटावकर, ऐश्वर्या परदेशी, वरुण नेवे, स्निग्धा कुलकर्णी, जुईली कलभंडे, ज्ञानेश्वर सोनवणे, भूषण खैरनार, दर्शन जेऊरकर यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचे पालक यांनी परिश्रम घेतले.





